ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे ठाण्यात भव्य आयोजन
७-८ मार्च रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’
रमेश औताडे
मुंबई : ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आणि नेतृत्व विकासासाठी ७ व ८ मार्च रोजी ठाणे येथे “विकसित भारत नारी शक्ती संगम” या शीर्षकाखाली दोन दिवसीय भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्रामीण भागातील स्वयंप्रेरित महिलांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही परिषद जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असून, देशातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभरातून व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी खासदार व प्रवर्तिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे भूषविणार आहेत.
परिषदेमध्ये महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याकडून चार सत्रांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण महिलांच्या नेतृत्व विकासासाठी आवश्यक सामाजिक-राजकीय बदल, आत्मनिर्भरता, अनुभवकथन आणि प्रेरणादायी उदाहरणांवर चर्चा होईल. या सत्रांमुळे ग्रामीण महिलांना नव्या उमेदीने पुढे जाण्याची दिशा मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
या परिषदेचे निमंत्रक म्हणून हिवरे बाजार गावचे सरपंच आणि प्रवर्तिनी व्यवस्थापन समिती सदस्य पोपटराव पवार तसेच प्रवर्तिनीचे कार्यकारी संचालक अभिजीत घड्याळपाटील कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
