चतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान;
मी भारतीय चा २५० वा प्रयोग
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : परदेशात जाऊन पैसे कमवायचे आणि विदेशात स्थायिक होऊन कुटुंबियांना भारतातच खितपत पडू द्यायचे, कुणी वृद्धाश्रमात तर कुणी कुठे, अशा विदारक परिस्थितीवर कोरडे ओढणाऱ्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे यशस्वी निर्माते, अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी साहिर लुधियानवी फौंडेशनतर्फे मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘बलराज साहनी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर इतका महत्वाचा आहे, अशी भावना रविंद्र देवधर यांनी व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्यानंतर रविंद्र देवधर आणि ऋषिकेश रानडे यांनी ‘मी भारतीय’ चा २५०वा प्रयोग सादर केला. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश टिळेकर, सचिव शिवानी चिलका, विश्वस्त सुचेत्रा देशपांडे आदी उपस्थित होते.
