पोलीस असल्याचे सांगत 5 लाख रुपये लांबवले
आरोपींना कोळसेवाडी पोलीसांनी घेतले अवघ्या 5 तासांत ताब्यात
कल्याण: पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुटे १०,५०,१०० च्या नोटा असलेले ७ लाख रु. असे २ लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे सांगून कल्याण पूर्व येथे बोलवून घेतले. तक्रारदार हे ५ लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन कल्याण पूर्व येथे आले असता सुट्टे पैसे देण्याचा बनाव करून एका स्कॉर्पिओ गाडीतून तीन-चार इसमांनी येऊन पोलीस आहेत तुम्ही इथे काय करता असे बोलून पैसे बदली करणारे इसमास त्यांच्या गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील पाच लाख रुपये असलेली पैशाची बॅग ओढून गाडीत बसून ते सर्वजण स्कॉर्पिओ गाडी मधून पळून गेले. हि माहिती तक्रारदाराने पोलीस ठाण्याला कळवताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच आरोपींचा शोध घेत या आरोपींना अवघ्या 5 तासांत अटक केली.
गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी पैसे बदली करण्यासाठी आलेल्या आरोपींचे मोबाईलचे वेळोवेळी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची स्कॉर्पिओ गाडी जुन्या पुणे हायवेने जात असल्याचे समजून आल्याने तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांना कळवले असता, सोमाटणे फाटा या टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडी MH-04-GD-7823 व त्यातील चार आरोपी संजय नागोजीराव भोसले, राह. गौरीपाडा, कल्याण, गौसपाक गुलाम हुसेन शेख, राह. गौरीपाडा, कल्याण, सोमीनाथ तुळशीराम गायकवाड, राह. मोहने, अरविंद नागनाथ जॉजट, राह. इंदिरानगर, कल्याण यांना पाच तासामध्ये ताब्यात घेण्यात आले.
तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता गुन्हयातील इतर आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगर कडुन शिर्डी मनमाड कडे स्कॉर्पिओ गाडी क्र. MH-05-AJ-0247 याने पळून जात असल्याचे समजल्याने लागलीच जवळचे पोलीस ठाणे राहुरी यांच्याशी संपर्क करून अहिल्या नगर शिर्डीरोड वर नाकाबंदी करून अहिल्या नगर-शिर्डी रोडवर पाहिजे असलेले आरोपी ५) उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू ६) शरद कुमार मोहन ७) नरेश फट्टू शर्मा तसेच आरोपी नामे ८) लक्ष्मण उर्फ प्रदिप विश्वनाथ धनवे राह. उल्हासनगर यास पुढील ३६ तासात ताब्यात घेतले.
आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी २ लाख ३६ हजार रूपये, गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या २ स्कॉर्पिओ गाडया, आरोपींचे वापरते एकुण ९ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हि कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरख, पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप भालेराव, पोउनि जगन सापटे, पोहवा. जाधव, सांगळे, वाघ, मुसळे, जरग, सौंदाणे, घुगे, आव्हाड, बोरसे, सांगळे, कापडी, पोना कोती, फटांगरे, पोशि गिते, इंगळे यांनी केली आहे.
