वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते.

स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *