‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर
अनिल ठाणेकर
ठाणे: ‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व ठाणे शहर आणि जिल्ह्यालगतच्या परिसरात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ८ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२५चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या१५ फेब्रुवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार समाजव्रती पुरस्कार स्टालिन दयानंद यांना, शिक्षणव्रती पुरस्कार सुनिता भोसले यांना तसेच कार्यव्रती पुरस्कार बाळासाहेब आठरे यांना घोषित झाले आहेत.
भांडूप, मुंबई येथे ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेत धडाडीने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टालिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. आणि एम. बी. ए.चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि देशातील अनेक भागात झपाट्याने लुप्त होत असलेली जैवविविधता टिकवण्यासाठी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थपणे काम केले आहे. २००९मधे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांजुरमार्गमधील १४० हेक्टर पाणथळ जमिनीवर कचरा डेपो करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली. स्टालिन यांनी या मागणीला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने एक केंद्रीय अभ्यासगटाद्वारे अभ्यास करून घेत कचरा डेपो करण्यास परवानगी नाकारली. ही एकच जमीन नव्हे तर मुंबईतील पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीचे अतिक्रमण रोखण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाने अस्वस्थ झालेल्या काही बिल्डरनी त्यांच्यावर गुंडांकरवी हल्लेही केले आहेत. २०१०मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या खाणींच्या प्रकल्पालाही प्रखरपणे विरोध केला आणि अखेर प्रकल्प रोखण्यात यश मिळवले. खारफुटी वन किंवा कांदळवन टिकवून त्यात वृद्धी करण्यासाठी ते कार्यरत आहेत. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे समाज कार्याबरोबरच समाज शिक्षण, कायदा शिक्षण घेता घेता थेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या फासेपारधी आणि अन्य भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या, आणि तब्बल १५०हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनिता भोसले यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली त्यांनी क्रांती संस्था स्थापन करून या सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती तपासणे, त्यांचं वह्या, पुस्तके, कपडे आदी गरजा पाहणे, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था पाहणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. इतकेच नव्हे तर बालमजुरी रोखणे, बालविवाह रोखणे, त्यासाठी पालकांत जागृती करत राहणे, त्यासाठी बालक पालक संवाद घडवून आणणे, हे काम सुनिता सातत्याने करत आहेत. ‘विंचवाचे तेल’ या आत्मकथनातून त्यांनी फासेपारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा धांडोळा घेतानाच समाजांतर्गत, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर अत्यंत प्रखर प्रकाशझोत टाकलेला आहे. आगामी काळात वंचित, पारधी, भटके आणि आदिवासी समूहातील मुलांसाठी आश्रमशाळा अगर वसतिगृह निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र विकास, महिला स्वयंसहायता गट बळकटीकरण, आदिवासी विकास संदर्भातील योजना, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बीज उपलब्ध व्हावे म्हणून शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार विकास योजना अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादन कार्यक्रम आदि अनेक कार्यक्रम राबवले आहेत. तसे करताना शेतकऱ्यांची अनोखी शेतीशाळा व घोंगडी बैठक राबवून शेतकरी हितासाठी काम केले आहे. पथनाट्य लेखन, गीतलेखन करून त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सामाजिक कार्यात सहभाग दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी सामाजिक आणि ग्रामविकास संस्थांबरोबर काम केले आहे. हे पुरस्कार रविवार ८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. शिरूर जिल्हा पुणे येथे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात. ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.
