सतीची विहीर प्रशासनाकडून दुर्लक्षीत
पडघ्यातील १०० वर्षे जुनी ऐतिहासिक विहीर खुली करण्यास टाळाटाळ
ठाणे: भिवंडी तालुक्यातील पडघे गावात ऐतिहासिक वारसा जपणारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी सर्वे नं. ७९/१० मधील ‘सतीची विहीर’ प्रशासनाकडून दुर्लक्षीत झाली आहे.ही विहीर बुजवण्यात आल्याचा धक्कादायक असा प्रकार उजेडात आला आहे. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सतीची विहीर पुन्हा खुली करून तिचे ऐतिहासिक स्वरूप जतन करावे, या मागणीसाठी पडघा ,समतानगर येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी मुंबई येथील पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे लेखी निवेदने दिली.
त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल भिवंडी तहसील कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे. मात्र, दोन महिने लोटूनही तहसीलदार स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा केवळ कागदोपत्री राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पडघा ग्रामपंचायत हद्दीतील ही विहीर जवळपास १०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या मते, याच सतीच्या विहिरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी सत्याग्रह केला होता. त्या वेळी ते समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी उतरले होते. सत्याग्रहींसह विहिरीवरून पाणी काढून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेमुळे ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याची जिवंत साक्ष मानली जाते.
समतानगर येथील दिवंगत हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय ९६) यांनी जिवंत असताना सांगितलेल्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेबांनी सतीच्या विहिरीवर सत्याग्रह केल्यानंतर शिसवीच्या झाडाखाली सभा घेतली होती आणि “मुलांना शिक्षण द्या” असा संदेश दिला होता. या आठवणींमुळे सतीची विहीर ही पडघ्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरते.ही ऐतिहासिक विहीर पुन्हा खुली होणार का? प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? की प्रक्रिया सुरू असून नागरिकांना माहिती दिली जात नाही? सतीची विहीर हा केवळ स्थानिक वादाचा विषय नसून सामाजिक न्यायाच्या इतिहासाशी निगडित वारसा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चौकट (“डॉ. बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेली ही विहीर आमच्या पडघ्याचा अभिमान आहे. त्यांच्या पाऊलखुणा पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. शासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार का, की अर्जांना केराची टोपली दाखवली जाणार?” असे आम्ही होऊ देणार नाही.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव)
