सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा
नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समागसेवक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ६० सभासदांचा वाढदिवस साजरा करून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ९१) व ज्ञानेश्वर भोगले (वय ७५) यांचा कुटुंबासमवेत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तर संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, संघाच्या सभासदांसाठी लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिले जाणारे स्मार्ट कार्ड देण्यासाठी लवकरच एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे महत्व सांगितले. संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. संघाचे सहसचिव राजेंद्र कदम यांनी वाढदिवस असणाऱ्या मानकऱ्यांच्या नावांचे वाचन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी नवीन सभासदांचे स्वागत केले. तर संघाचे सहखजिनदार नाना शिंदे यांनी देणगीदारांचे आभार मानले. संघाचे ज्येष्ठ सभासद पत्की आणि संघाच्या माजी उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी व इतर सभासदांनी सामुहिकरित्या सुरेल आवाजात वाढदिवसाचे गीत म्हटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून ९१ वर्षाचे ज्येष्ठ सभासद देणगीदार ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या स्नॅक वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
