चवदार तळे सत्याग्रह दिनी अनुयायांसाठी योग्य निवास, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्या- अण्णा बनसोडे
मुंबई- ५ मार्च
चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त २० मार्च रोजी महाड येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी योग्य निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला दिल्या. विधानभवन येथील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तसेच स्थानिक आमदार भरतशेठ घोगावले, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे आणि संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी २० मार्च रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महाड येथे लाखो अनुयायी क्रांतीस्तंभ आणि चवदार तळे येथे अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
यावेळी चवदार तळे परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, विजेची रोषणाई, अग्निशमन यंत्रणा, पोलीस सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच अनुयायांसाठी निवासी व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच १९ ते २१ मार्च या कालावधीत वीर, माणगाव, वामने आणि करंजडी रेल्वे स्थानकांपासून महाड शहरापर्यंत बस सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई विहार सभागृह अनुयायांसाठी खुले ठेवण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
चवदार तळे हे केवळ पाण्याचे साधन नसून मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसासाठी येणाऱ्या अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
