स्वाती घोसाळकर
मुंबई : सुर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने वानखेडेवर इंग्ल्डच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नांची अक्षरशा होळी केली. उपांत्य फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारताच्या विजयाचा शिल्पकार पुन्हा एकदा संजू सॅमसन ठरला. ८ चौकार आणि ७ षटकारांसहीत ४२ चेंडूतील त्याच्या ८९ धावांच्या वादळी खेळीने भारताच्या विजयाचा पाया रचला.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दबावाखालीही अचूक गोलंदाजी करत विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपली विजयी परंपरा कायम ठेवली असून आता अंतिम सामन्यात त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. एकंदरीत भारतीय संघ इतिहासाची पुनरावृत्तीकडे अजून एक पाऊल टाकलं आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत २० षटकांत २५३ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर संजू सॅमसनने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत ४२ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत ७ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता.
सॅमसनला मधल्या फळीतील फलंदाजांची चांगली साथ मिळाली. शिवम दुबेने ४३ धावा, इशान किशनने ३९ धावा केल्या, तर हार्दिक पंड्याने २७ आणि तिलक वर्माने २१ धावांची भर घालत भारताला भक्कम धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडकडून विल जॅक (२/४०) आणि आदिल रशीद (२/४१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात सावध झाली. मात्र हॅरी बेथेलने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. त्याने अवघ्या ४५ चेंडूत आपले पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. बेथेलने १०५ धावांची झुंजार खेळी करत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी अचूक मारा केला. जसप्रीत बुमराहने आपल्या नेहमीच्या अचूक यॉर्करने धावगती रोखून धरली. सॅम करनने १४ चेंडूत १८ धावा करत बेथलला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बाद झाल्यानंतर इंग्लंडवर दबाव वाढला. सामन्याचा टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा बेथेल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. हार्दिक पंड्याने अचूक थ्रो करत चेंडू संजू सॅमसनकडे पोहोचवला आणि सॅमसनने स्टंप उडवत बेथेलचा डाव संपवला.
अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ३० धावांची गरज असताना शिवम दुबे गोलंदाजीसाठी आला. धीम्या षटकांच्या गतीमुळे भारताला शिक्षा झाली होती आणि बाहेरील क्षेत्ररक्षणात फक्त चारच क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने बॉल अक्षर पटेलच्या ऐवजी शिवम दुबेच्या हातात दिला. जोफ्रा आर्चरने अखेरच्या षटकात तीन षटकार मारत सामना रोमांचक केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत नियंत्रण राखले आणि अखेरीस भारताने ७ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.
येत्या ८ मार्चरोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताची फायनलमध्ये न्युझीलंडविरुद्ध मुकाबला होईल.
photot caption
संजू सॅमसन
४२ चेंडूत ८९ धावा
७ षटकार आणि ८ चौकार
