ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा
ओमकारच्या २१ धावांत ५ बळी
ठाणे : ओमकार सावंतची भेदक गोलंदाजी आणि सुमेद वेवट्रेची अर्धशतकी खेळीच्या जोरावर अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विहंग इंटरप्राइजेसचा आठ गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली . विहंग इंटरप्राइजेसला अवघ्या ७८ धावांत गुंडाळ्यावर दोन फलदाजांच्या मोबदल्यात ८१ धावा बनवून अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या विहंग इंटरप्राइजेसच्या फलंदाजानी सामन्यात सपशेल निराशा केली. त्यांच्या तीनच फलंदाजाना धावांचा दुहेरी आकडा गाठता आला. डावात १५ धावा करणारा सुधिर यादव संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याखालोखाल संदीप यादवने नाबाद १० आणि रणजीत मगरने १२ धावा बनवल्या. सामनावीर ठरलेल्या ओमकारने ७ षटकात २१ धावांच्या बदल्यात अर्धा संघ बाद केला. देवीकीरण चेट्टीने तीन आणि अजिंक्य पवारने दोन फलंदाज बाद केले. अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने ११.३ षटकात ८१ धावांसह विजय नक्की केला. सुमेदने संघाला विजयाचा दरवाजा उघडून देताना २४ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत ५१ धावा बनवल्या. वैभव मजगेने नाबाद २६ धावा केल्या. संदीप यादव आणि आर्यन देशमुखने प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – विहंग इंटरप्राइजेस : २३.५ षटकात सर्वबाद ७८ (सुधीर यादव १५, संदीप यादव नाबाद १०, रणजीत मगर १२, ओमकार सावंत ७-२१-५, देवीकीरण चेट्टी ६.५-१-२६-३, अजिंक्य पवार ७-१-१२-२) पराभूत विरुद्ध अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग : ११.२ षटकात २ बाद ८१ ( सुमेद वेवट्रे ५१, वैभव मजगे नाबाद २६, संदिप यादव ४.३-२५-१, आर्यन देशमुख ३-१९-१).
