भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिकेसाठी निवड समिती जाहीर

महाराष्ट्रच्या गोविंद शर्मांची निवड समितीवर वर्णी

भारतीय मातीतील अस्सल आणि वेगवान खेळ असलेल्या खो-खोचा आंतरराष्ट्रीय थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. भारत–नेपाळ खो-खो कसोटी मालिका २०२६ (पुरुष व महिला) येत्या मार्च महिन्यात खेळविण्यात येणार असून त्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय खो-खो महासंघाने (KKFI) जोरदार तयारी सुरू केली आहे. मैदानावर घाम गाळणाऱ्या आणि चपळाईने खेळणाऱ्या खेळाडूंनाच संधी मिळावी, या उद्देशाने महासंघाने अत्यंत अनुभवी आणि प्रभावी निवड समितीची घोषणा केली आहे. महासंघाचे सरचिटणीस उपकार सिंग विर्क यांनी सांगितले की, “खेळाडूंची निवड ही केवळ नावावर नव्हे तर मैदानावरील प्रत्यक्ष कामगिरी, तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमता यावर आधारित असेल.”

निवड समितीतील दिग्गजांची फळी : अनुभव आणि गुणवत्तेचा संगम

भारतीय संघाच्या निवडीसाठी महासंघाने देशभरातील अनुभवी आणि नामांकित व्यक्तींना एकत्र आणत दिग्गजांची भक्कम फळी उभी केली आहे. या समितीचे नेतृत्व सुधांशू मित्तल (अध्यक्ष – IKKF व KKFI) हे चेअरमन म्हणून करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार सिंग विर्क (सरचिटणीस – KKFI), गोविंद शर्मा (खजिनदार – KKFI), संजीव शर्मा (चंदीगड), विकास हुडा (प्रशिक्षक – RSPB), संजीव कुमार (दिल्ली), सुनिता राणी (गुजरात), नीतू राणी (पंजाब), सुषमा सारोलकर (मध्य भारत), एम. नटराजन (कर्नाटक) आणि नेताई कर (पश्चिम बंगाल) हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. या अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची निवड अत्यंत काटेकोर पद्धतीने केली जाणार आहे.

गांधीनगरमध्ये रंगणार खेळाडूंची खरी कसोटी

या निवड प्रक्रियेचे केंद्रबिंदू ठरणार आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) – प्रादेशिक केंद्र, गान्धीनगर (गुजरात). निवड समिती दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी येथे दाखल होणार असून ६ आणि ७ मार्च २०२६ रोजी खेळाडूंच्या कौशल्याची सखोल चाचणी घेतली जाईल. या चाचण्यांमध्ये आक्रमण, संरक्षण, वेग, तांत्रिक कौशल्य, सहनशक्ती आणि निर्णयक्षमता यांचा बारकाईने आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सराव करणाऱ्या खेळाडूंना या निवड प्रक्रियेत आपली क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

पारदर्शकता आणि गुणवत्तेचा नवा अध्याय

भारतीय खो-खो महासंघाने उचललेले हे पाऊल खेळातील पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. निवड समितीच्या अहवालानंतर सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने अंतिम भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील या आगामी कसोटी मालिकेकडे संपूर्ण देशातील खो-खोप्रेमींचे लक्ष लागले असून गान्धीनगरमधील निवड प्रक्रिया हीच भारताच्या विजयाचा पाया ठरणार, असा विश्वास क्रीडा वर्तुळात व्यक्त केला जात आहे. मैदानावर शिट्टी कडाडेल, धुरळा उडेल आणि पुन्हा एकदा भारतीय खो-खोचा डंका जगभर घुमेल, अशी आशा सर्वांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *