मुंबई : दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात उकाडा असणार आहे.
तापमानात अचानक लक्षणीय वाढ झाल्याने महामुंबई परिसरातील नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले. पुढील तीन दिवस तापदायक असतील, असा अंदाज हवमानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपर्यंत तापमान काहीसे दिलासादायक होते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढली. सूर्य माथ्यावर आल्यानंतर वैशाख सुरू झाला की काय, असे वाटू लागले.
दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी १२ नंतर उष्ण वाऱ्याचे चटके बसू लागले. दुपारी दोन ते तीनदरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने जिवाची काहिली होऊ लागली. लोकल आणि बसच्या प्रवाशांना उन्हाच्या झळांनी हैराण केले. सूर्यास्तापर्यंत असेच वातावरण होते.
महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असला तरी ८ मार्चपर्यंत कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट कायम राहू शकते.
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनमधून उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. परिणामी, कोकणपट्ट्यात तापमान वाढले आहे.
पाच वर्षांतील मार्चमधील उच्चांकी तापमान
दिनांक व वर्ष तापमान
१२ मार्च २०२५ ३९.२
२२ मार्च २०२४ ३८.८
१३ मार्च २०२३ ३९.४
१५ मार्च २०२२ ३९.६
२८ मार्च २०२१ ४०.९
