८ मार्च रोजी महिलांसाठी मोफत बस प्रवास

मिरा -भाईंदर

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरांतर्गत तसेच शहराबाहेरील ठाणे व बोरीवली या मार्गांवर प्रवासी बससेवा नियमितपणे चालविण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित, सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गरज लक्षात घेऊन परिवहन सेवेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रमही राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसमधून महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांनी मा. आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे सूचना केली होती. त्यानुसार परिवहन विभागाने सादर केलेला प्रस्ताव मा. आयुक्त यांनी मंजूर केला.

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मागील पाच वर्षांपासून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाला शहरातील महिलांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने महिला या सुविधेचा लाभ घेत आहेत. महानगरपालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार ८ मार्च २०२१ रोजी ११,५५२, ८ मार्च २०२२ रोजी २१,४६१, ८ मार्च २०२३ रोजी २५,८३८, ८ मार्च २०२४ रोजी २२,१३१ तसेच  ८ मार्च २०२५ रोजी ३३,४३२ महिलांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बससेवेचा मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. दरवर्षी वाढत असलेल्या या प्रतिसादामुळे महिलांमध्ये या उपक्रमाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

महिलांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजात महिला सन्मान व महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.  महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *