जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कलागुणदर्शन स्पर्धांना महिलांचा उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 4 ते 6 मार्च या कालावधीत महात्मा फुले स्मृती भवन, सेक्टर-3, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न झालेल्या या स्पर्धांना महिला समुहांचा उत्साही सहभाग लाभला.
यामध्ये समुह गायन स्पर्धेत 10 महिला समुहांनी सहभाग घेतला तसेच समुह नाटिका स्पर्धेत 3 महिला नाटयसमुह सहभागी झाले. समुह नृत्य स्पर्धे दोन गटांमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील स्पर्धेत 6 नृत्य समुह तसेच 40 वर्षे वयापुढील समुह नृत्य स्पर्धेत 9 नृत्य समुहांनी उतस्फुर्त सहभाग घेतला.
10 महिला भजन मंडळांनी महिला भजन स्पर्धेत सहभागी होउुन आपले कलागुण दर्शन घडविले. महिलांच्या अतिशय आवडत्या मंगळागौर स्पर्धेत 5 महिला समुहांनी सहभागी होउुन हा उपक्रम यशस्वी केला. महिला सुरक्षितता विषयक जनजागृती, पर्यावरण, शिक्षण या तीन विषयांवर आयोजित लहान व्हिडीओ (Short Video) स्पर्धेमध्ये 4 समुहांनी सहभाग घेतला. सर्वच स्पर्धांमध्ये महिला समुहांनी उत्साही सहभाग घेतला.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि.8 मार्च, 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न होणा-या विशेष कार्यक्रमा प्रसंगी होणार आहे. यावेळी महापालिका क्षेत्रातील “विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पुरस्कार” वितरण तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तरी दि. 8 मार्च 2026 रोजी, सकाळी 10.00 पासून जागतिक महिला दिनानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न होणा-या विशेष कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व महिलांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
