युद्ध इराण-अमेरिकेचे, पण नाशिकचा द्राक्ष उत्पादक कोलमडला!

अडीच हजार कोटींचा माल समुद्रात अडकला

हरिभाऊ लाखे

नाशिक : सहाव्या इराण-अमेरिका युद्धाची व्याप्ती दिवशी वाढली असून, इराणलगतच्या हॉर्मुझ खाडी आणि पर्शियन आखातात गेल्या सहा दिवसांपासून तब्बल ३,२०० मालवाहू जहाज अडकून पडले आहेत. त्यात नाशिकसह महाराष्ट्रातून द्राक्ष, केळी, कांदा, तांदूळ तसेच भाजीपाला घेऊन निघालेली सुमारे ७० ते ८० मालवाहू जहाजे आहेत. वृत्तपत्र सदस्यता

या जहाजांतील विविध शेतमालाचे मूल्य सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या आसपास असून, युद्धामुळे निर्यातदारांची कमाई धोक्यात आली आहे. नुकसान टाळण्यासाठी उरण जेएनपीटीतून दोन दिवसांत सुमारे ४५० कंटेनर नाशिकला माघारी आले आहेत. त्यातील काही माल मलेशिया, इंडोनेशियाला पाठविण्याची चाचपणी निर्यातदारांनी सुरू केली आहे.

इराण युद्धामुळे जेएनपीटी बंदराबाहेर अडकून पडलेले द्राक्ष कंटेनर निर्यातदारांनी माघारी बोलावून घेतले आहेत. कंटेनरला दररोजचे पाच हजार रुपये भाडे द्यावे लागत असल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी निर्यातदारांनी कंटेनर बोलावून त्यातील निम्मा माल स्थानिक बाजारपेठेकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी स्थानिक बाजारपेठेत ११० द्राक्षाचा किलोचा दर ८० ते ९० रुपयांवर आला आहे. उरण ते नाशिकच्या वाहतूक भाड्यापोटी प्रत्येक कंटेनरसाठी ४० हजार रुपयांचा खर्चही काही निर्यातदारांनी सोसला आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे ४५० कंटेनर नाशिकला माघारी आल्याची माहिती सहारा एक्स्पोर्टसचे विलास जीवरक यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

जिल्ह्यात सुमारे २०० कोल्ड स्टोअरेज आहेत. प्रत्येक कोल्ड स्टोअरेजमध्ये सुमारे १० ते १२ कंटेनर एवढा माल सध्या साठविलेला आहे. एका कंटेनरमध्ये १२ ते १५ टन माल बसतो. आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यात निर्यातीचा सुमारे ३६ हजार टन द्राक्षमाल कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकून पडलेला आहे. त्यातील निम्मा माल मलेशिया, इंडोनेशिया या राष्ट्रांना पाठविण्याची तयारी निर्यातदारांनी सुरू केली आहे. मलेशिया, इंडोनेशियात रमजानमुळे नाशिकची द्राक्षे विक्री करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज मालकांनी निर्यातदार एजंटांशी बोलणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत किमान १०० कंटेनर माल तिकडे निर्यात होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास इराण युद्धामुळे होणारे नुकसान भरून निघण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घसरण : इराण युद्धामुळे द्राक्षांच्या दरावर तत्काळ परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षांचे दर २० ते ३० रुपयांनी घसरले आहे. आखातात द्राक्षांचे दर ११० ते १२० रुपयांच्या दरम्यान होते. ते ७० ते ९० रुपयांवर आले आहेत, तर युरोपात १६० ते १९० रुपयांवर असलेला दर १३० ते १४० रुपयांवर आला आहे. मालाची गुणवत्ता घसरण्याच्या भीतीने हे दर उतरल्याची माहिती कोल्ड स्टोअरेजच्या मालकांनी दिली. ३० रुपयांनी दरात घसरण झाल्याने राज्यातील द्राक्ष निर्यातदारांना हा अतिरिक्त १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. युरोपला आफ्रिकेमार्फत जाणाऱ्या मालासाठी जहाज वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे नर्यातदारांचे नफ्याचे गणित कोलमडले. फ्रीज कंटेनरला दररोज पाच हजार रुपये द्यावे लागतात. चार दिवसांत २० हजार रुपये अनेक निर्यातदारांनी मोजले आहेत. हे नुकसान सहन करणे शक्य नसल्याने गेल्या दोन दिवसांत उरण जेनपीटी बंदराबाहेरील ४५० कंटेनर माघारी आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *