रमेश औताडे

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‘पिंक ओपीडी’चा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.

राज्यातील ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्याची ही व्यापक मोहीम राबवली जाणार असून, त्यामुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालता येईल. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावले उचलत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांच्या धर्तीवर ‘आरोग्य आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आणली असून आरोग्य सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला जाणार असल्याचे याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टर, शल्यचिकित्सक, परिचारिका आणि आरोग्य सेविकांचा यावेळी आवर्जून सत्कार करण्यात आला. यावेळी

याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *