जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात
दिवा: जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि ओम साई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिव्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यातील महिला वकील, सीए, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाजसेविका, शाळा व्यवस्थापिका, कीर्तनकार तसेच बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला रोटरी ३१४२ जिल्हा सचिव विनेश नायर आणि नगरसेविका साक्षी मढवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरीच्या अध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, सचिव, इतर सदस्यांच्या हस्ते महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून ‘दुसरी मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध कलावंत साधना चौधरी- भरे यांनी सादर केलेल्या या नाटकाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम दिवा (पूर्व) येथील एस.एम.जी. विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि सचिव स्वप्नील गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
