शहापूर बिबट्या शिकार प्रकरण
दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार
१५ नखं हस्तगत
अविनाश उबाळे
ठाणे- शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या बिबट्याच्या शिकारी प्रकरणी टोळीतील दोन जणांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे.तथापी बिबटयाच्या हत्येप्रकरणी टोळीतील आणखी तीन संशयित आरोपी हे फरार असून हत्या करण्यात आलेल्या बिबटयाची १५ नखं जंगलातून हस्तगत करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे बिबटयांची क्रूरपणे शिकार करुन नंतर मृत बिबट्यांच्या अवयवांची लाखो रुपयांना तस्करी करणारं हे एक भलं मोठं रॅकेट ठाणे जिल्हयात कार्यरत असल्याचा अंदाज या घटनेमुळे आता वर्तविण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात वनकर्मचाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्रातील ढाकणे,चिंध्याचीवाडी,कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला होता.शिकारी टोळीने या बिबट्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन बिबट्याच्या पायाचे पंजे तोडून नखे काढून घेतली होती.अवयवांची तस्करी करण्यासाठी बिबट्याची अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
तथापि बिबट्याच्या शिकार प्रकरणी लागलीच शहापूर वनविभागाने गुन्हा दाखल करत वेगाने तपासाची सुरू हलविली असता या घटनेतील दोन संशयित आरोपींना चौवीस तासांच्या आत अटक करण्यात वनविभागाला यश आले.जेरबंद केलेल्या या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी तपास पथकातील वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी केली असता बिबट्याच्या शिकारी मध्ये आणखी तीन जणांचा समावेश असल्याची कबूली पकडलेल्या दोन आरोपींनी दिली.व मृत बिबट्याची नखं जंगलात एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी चौकशी दरम्यान दिली दरम्यान ही माहिती मिळताच हत्या झालेल्या बिबट्याच्या पायांची एकूण १५ नखं जंगलातून तपास पथकातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हस्तगत केली आहेत.दरम्यान बिबट्याच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना १६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.टोळीतील आणखी तीन फरार झालेल्या आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.फरार झालेल्या आणखी तीन संशयित आरोपींना पकडल्यानंतर बिबट्याच्या हत्येचे खरे कारण आणि तस्करीचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
