प्रभादेवीत चढाई-पकडींचे द्वंद्व ९ मार्चपासून
राज्यातील १८ दिग्गज संघ स्वामी समर्थच्या कबड्डीत भिडणार
मुंबई, दि. ८ (क्री.प्र.)- मुंबई कबड्डीची खरी ताकद म्हणजे मंडळ आणि क्लबचे संघ. हेच स्थानिक संघ प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त आपली ताकद दाखवायला सज्ज होत आहेत. टी-२० वर्ल्ड कपची फटकेबाजी थांबताच सोमवार ९ मार्चपासून कबड्डीचा चढाई-पकडींचा पाचदिवसीय खेळ रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीला कबड्डी पंढरीचे रुप प्राप्त झाले असून यात राज्यातील अव्वल १८ स्थानिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्या ८३ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेला ग्लॅमरस करण्यासाठी इंडियन ऑइल, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, न्यू इंडिया अॅश्युरन्स, आरसीएफ, बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत बँक, मुथूट फायनान्स, आरबीएल बँक आणि बँक ऑफ इंडिया कंपन्यांनी आर्थिक सहकार्य दिले आहे. त्यामुळे कबड्डी आयोजनातल्या या दादा मंडळाने राज्यातील एकापेक्षा एक अशा स्थानिक पुरुष संघांना स्पर्धेत निमंत्रित केले आहे. आजवर व्यावसायिक कबड्डी संघांची मेजवानी सादर करणार्या मंडळाने मुंबई शहरच्या तगड्या १२ संघांसह उपनगर, पुणे, नांदेड, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांनी दिली.
प्रो कबड्डीच्या ३० सुपरस्टार्सचीही चढाई
या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात भारतीय रेल्वेचा पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, तसेच अस्सल मुंबईकर संकेत सावंत, पुणेरी पलटणचा आकाश शिंदे, यु मुंबाचा अजित चव्हाण असे तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अशा या सुपरस्टार खेळाडूंच्या उपस्थितीत कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधिश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊणलाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही २५ हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी घसघशीत रोख पुरस्कार तर चढाई आणि पकडवीरालाही रोख इनाम दिले जाणार आहे.
राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ
अ गट : सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई शहर), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई शहर.
ब गट : विजय नवनाथ मंडळ (मुंबई शहर), विजय क्लब (मुंबई शहर), एसएसजी फाऊंडेशन (मुंबई शहर)
क गट : सिद्धीप्रभा फाऊंडेशन (मुंबई शहर), ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकूर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)
ड गट : वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई शहर), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई शहर)
इ गट : स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन अॅकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई शहर)
फ गट : गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)
