‘रहाडी’ मध्ये ‘धप्पा’
नाशिकमध्ये रंगपंचमीचा अपूर्व उत्साह
हरिभाऊ लाखे
नाशिक – ‘रहाड’ संस्कृतीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली नाशिकची रंगपंचमी अभूतपूर्व उत्साहात साजरी होत आहे. रंगांनी तुडूंब भरलेल्या शहरातील आठ रहाडींमध्ये उड्या मारण्यासाठी म्हणजेच ‘धप्पा’ मारण्यासाठी तरुणाईत चढाओढ सुरु आहे. रहाडींची विधीवत पूजा झाल्यानंतर रहाडींमध्ये रंगप्रेमी डुंबू लागले. नाशिकमध्ये होळी, धुलिवंदन नव्हे तर, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. नाशिकमध्ये पेशवेकालीन अनेक रहाडी आहेत. रहाड म्हणजे पेशवेकाळात बांधलेले मोठे हौद. साधारणपणे एखाद्या छोट्या बारवप्रमाणे यांचे स्वरूप असते. दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी या रहाडी खोदल्या जातात. आणि रंगपंचमीनंतर पुन्हा त्या मातीने बुजविल्या जातात.
या रहाडी प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहेत. त्यापैकी यंदाच्या रंगपंचमीसाठी आठ रहाडी तयार झाल्या. नाशिकमध्ये जुन्या काळात म्हणजेच १८ व्या शतकात १८ पेक्षा अधिक रहाडी होत्या, असे सांगितले जाते. त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडींच्या ठिकाणी वाडे बांधले गेले. त्यामुळे काही रहाडी कायमच्या अस्तंगत झाल्या. आता शहरातील आठ रहाडी रंगपंचमीसाठी तयार झाल्यात.
त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन, शिवाजी चौक आणि दंडे हनुमान चौक येथील रहाडींचा समावश आहे. तसेच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजेबहाद्दर लेन येथील रहाड सुमारे ८० वर्षानंतर यंदा उकरण्यात आली. अशाप्रकारे शहरात यंदाची रंगपंचमी आठ रहाडींमध्ये होतआहे. या प्रत्येक रहाडींची खोली साधारणपणे १० फूटपेक्षा अधिक असते.
रंगपंचमीनिमित्त रविवारी सकाळपासून रहाडी वेगवेगळ्या रंगांनी भरण्यात आल्या. त्यात राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, शनी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी, दंडे हनुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा, शिवाजी चौकातील रहाडीचा रंग लाल आहे.
रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले. प्रारंभी हा रंग मोठ्या भांड्यांमध्ये उकळविण्यात आला. त्यानंतर तो रहाडींमध्ये टाकण्यात आला. रहाडींचे पूजन झाल्यानंतर परंपरेनुसार मानकऱ्यांनी प्रथम रहाडीत उड्या मारल्या. त्यानंतर मग रहाडीत डुंबण्यासाठी एकच चढाओढ सुरु झाली.
रंगपंचमी आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याने जुनी तांबट लेने, मधली होळी आणि राजेबहाद्दर लेन येथील रहाडींमध्ये मानकऱ्यानंतर सर्वप्रथम महिलांना डुंबण्यास प्राधान्य देण्यात आले. महिलांसाठी खास वेळ ठरवून देण्यात आली होती. ती वेळ संपल्यानंतर पुरुषांनी रहाडींमध्ये झोकून देण्यास सुरुवात केली. मेनरोडवरील संत गाडगे महाराज चौकात सार्वजनिक रंगपंचमीसाठी खास शाॅवरची व्यवस्था करण्यात आली होती. संगीताच्या तालावर येथे तरुणाईची झुंबड उडाल्याचे दिसून आले.
