राष्ट्रवादी शरद पवारच्या आरोग्य शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी
अनिल ठाणेकर
ठाणे : महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ॠताताई आव्हाड, सिद्धीविनायक रूग्णालयाचे डॉ. अमोल गिते यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महिलाध्यक्षा मनिषा भगत, कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
घर-संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देत नसतात. त्यातच संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. ही बाब ध्यानात घेऊन ८ मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, तुळजाभवानी मंदिराशेजारी, गणेशवाडी पांचपाखाडी ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हृदयरोग तपासणी, (ECG), किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह (शुगर) आदी आजारांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या महिलांवर मोफत शस्त्रक्रिया सिद्धीविनायक रूग्णालयात करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी ॠता आव्हाड यांनी, महिला घर चालविताना स्वतःच्या आरोग्याचे बजेट आखत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केले असल्याचे मनिषा भगत यांनी सांगितले. डॉ. अमोल गिते यांनी, या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन प्रोस्टेटवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सांगितले. दरम्यान , महिला दिनाच्या अनुषंगाने ऋता आव्हाड, मनिषा भगत यांच्य् हस्ते महिला पत्रकार अनघा सुर्वे, रोहिणी दिवाण, सुचिता बिराजदार, सारिका साळुंके, नम्रता सूर्यवंशी, वंशिका चाचे, जयश्री शेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, नवनिर्वाचित नगरसेविकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी जगताप ,रिटा यादव ,वर्षा मोरे ,सुषमा पाटील ,सपना पाटील, अश्विनी पालकर , नीलिमा शेख , माधुरी सोनार , शशिकला पुजारी , ज्योती निम्बर्गी , मनीषा पाटील , मल्लिका पिल्ले, हाजी बेगम , मुनिपा सय्यद , रेणुका अलगुडे, रेशमा भानुशाली, कल्पना नार्वेकर, रुबीना सय्यद, उषा नरहरे,पूजा जाधव , गीतारंजन , श्रुती डिसोलकर , ज्योती चव्हाण, संगीता चंद्रवंशी , लिलाबाई फुलपगारे ,संगीता लोकरे आदी उपस्थित होते.
