राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी
इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी
मुंबई, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी)-प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा रणसंग्राम रंगला आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा झंझावात अनुभवायला मिळाला. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेची सुरुवातच अशी झाली की मैदानात प्रत्येक चढाईसोबत श्वास रोखले जात होते. आघाडीवरून पिछाडी, पिछाडीवरून आघाडी, एका गुणाने निसटलेला विजय, तर कधी शेवटच्या क्षणी साधलेली बरोबरी, अशा नाट्यमय घडामोडींनी कबड्डीप्रेमींना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले. पहिल्या दिवशी रंगलेल्या थरारात इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजयांसह स्पर्धेत विजयी सलामी दिली.
टी-२० विश्वचषकाच्या गदारोळानंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या चढाई-पकडीच्या युद्धाने कबड्डीप्रेमींना अस्सल ग्रामीण थराराची मेजवानी दिली. शेवटच्या क्षणी स्पर्धेत उतरलेल्या पालघरच्या इच्छाशक्ती क्रीडा मंडळाने आपल्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांचा उत्साह अक्षरशः द्विगुणित केला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, स्पर्धा संयोजक आणि आमदार महेश सावंत, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. एलआयसी, मुथुट फायनान्स, इंडियन ऑइल यांच्या पुरस्काराने सुरू झालेल्या या स्पर्धेत लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला ३६-२० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्या डावात लायन्सच्या राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला. एका क्षणी २०-३६ पिछाडीवर असलेल्या लायन्सने इच्छाशक्तीवर लोन चढवत धावसंख्या ४१-३९ पर्यंत नेली आणि सामना अक्षरशः नखशिखांत थरारला. अखेर इच्छाशक्तीने ४२-४० अशी निसटती बाजी मारत विजय खेचून आणला.
प्रो कबड्डीतील सुपरस्टार खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देणार्या पंकज मोहितेने एसएसजी फाउंडेशनसाठी अक्षरशः वादळी खेळ केला. त्याच्या ११ गुणांच्या झंझावाती चढायांच्या जोरावर एसएसजीने प्रतिस्पर्ध्यावर ५३-३१ असा एकतर्फी विजय मिळवला. सूरज जाधव, तेजस टक्के आणि आशिष चौधरी यांनीही दमदार साथ दिली.
सुशांत साहिल याच्या तुफानी पकडींनी अंकुश स्पोर्ट्स क्लबला सिद्धीप्रभा फाउंडेशनविरुद्ध ३४-२७ असा शानदार विजय मिळवून दिला. सिद्धीप्रभाकडून रुपेश साळुंखे याने अष्टपैलू खेळ करत १६ गुणांची कमाई केली, मात्र त्याचा झुंजार प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यांच्यातील लढतही तितकीच रंगतदार ठरली. अक्षय तावडे आणि प्रशांत पवार यांच्या खेळाने पार्लेला जोर मिळाला, तर धनंजय सरोज आणि शार्दुल हरचेकर यांच्या चढायांनी गोल्फादेवीने पहिल्या डावात १८-१८ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जीव तोडून संघर्ष केला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या लढतीत पार्ले स्पोर्ट्स क्लबने ३५-३४ असा निसटता विजय मिळवला. पार्लेने आपल्या दुसर्या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा ४५-२८ असा पराभव करून दुसरा विजयही नोंदवला.
इच्छाशक्तीच्या दुसर्या सामन्यातही थराराचा कळस गाठला. यश निंबाळकरच्या वेगवान चढायांनी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबविरुद्ध इच्छाशक्तीला २४-१६ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्या डावात गुड मॉर्निंगच्या शार्दुल पाटीलने तुफानी चढायांनी इच्छाशक्तीच्या बचावफळीची अक्षरशः झोप उडवली. त्याने १६ गुणांची कमाई करत सामना शेवटच्या मिनिटाला ४१-४० असा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, मात्र निर्णायक क्षणी यश निंबाळकरने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत इच्छाशक्तीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शार्दुल पाटीलने अखेरच्या चढाईत एक गुण मिळवत सामना ४२-४२ असा बरोबरीत सोडवला आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी या थराराला जोरदार दाद दिली.
