इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह
कल्याण: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेली “साडी वॉकाथॉन” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत आरोग्य, एकता आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या वॉकाथॉनचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विजया पोटे, ज्योती पाटील, गणेश जाधव, शालिनी वायले आणि डॉ. तनुजा वायले यांचा सत्कार करण्यात आला.
या वॉकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी साडी परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध गटांमधील सहभागी महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागींचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा दिप्ती दिवडकर, सचिव ॲड. सुषमा पटेल, माजी अध्यक्षा साची कदम, ॲड. नीता कदम, ॲड. अर्चना सबनीस, सविता जरपडे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. साडी परिधान करून चालण्याच्या या अनोख्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासोबतच भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
