गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात
मिरा – भाईंदर
भारतात महिलांमध्ये कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे एक प्रमुख कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणूच्या संसर्गामुळे होतात आणि वेळेवर लसीकरण करून हा कर्करोग प्रभावीपणे रोखता येतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये सदर एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्चला झाला आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने १४ ते १५ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण मात्र अद्याप १५ वर्षे पूर्ण नाही अशा) मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर एचपीव्ही मोहिमेचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता, उप-महापौर ध्रुवकिशोर पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती अनिता पाटील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर लहाने यांच्या उपस्थितीत नवघर आरोग्य केंद्रात करण्यात आले. या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस (गार्डासिल -४) सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) आणि महानगरपालिका / शासकिय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाईल.
एचपीव्ही लस जगभरात जवळजवळ २० वर्षांपासून वापरली जात आहे, आणि जगभरात सदर लसीचे करोडो डोस दिले गेले आहेत. व्यापक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की ही लस सुरक्षित आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवणे, मळमळ, चक्कर येणे इ. किरकोळ त्रास वगळता सदर लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे सदर लसीच्या दुष्परिणामाबाबत अपप्रचार करणारे व्हिडीओज् समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्याकडे कृपया दुर्लक्ष करुन सर्व पालकांनी आपापल्या मुलींना सदर लस द्यावी असे मिरा भाईंदर महानरगपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
