छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा
आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी
केतन खेडेकर
मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे सर्वप्रथम सन १९९६ मध्ये नाव बदलून ‘छत्रपति शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. तद्नंतर जून २०१७ मध्ये या नावात ‘महाराज’ शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि या स्थानकाचे नाव ‘छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. खेदाची बाब हि आहे की, या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून सुमारे २० वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आजतागायत बसविण्यात आलेला नाही. या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे. या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा केंद्र सरकारने समावेश केला असल्याची ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माहे डिसेंबर २०२५ मध्ये दिली आहे. त्यानुसार शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी या स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्री मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत केली.
