मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ना ‘अर्थ’ आहे… ना कोणता ‘संकल्प’ आहे….या अर्थसंकल्पातून फक्त काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे, या सरकारचा मंत्र म्हणजे काम कमी आणि जाहिरात जास्त तिजोरीत खडखडाट तरीही जाहिरातीचा घाट अशा शब्दात राष्टवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना टिका केली आहे.
यावेळी बोलताना पाटील यांनी सर्वच विभागात निधीची कपात कशा रितीने करण्यात आली याची माहिती आकडेवारीसह सभागृहात मांडली. कोणत्याही देशाला मजबूत अर्थव्यवस्था बनवायची असेल तर मध्यमवर्ग आणि त्यांच्या खालचा वर्ग याच्यात पैसे गेले पाहिजेत तर ती अर्थव्यवस्था मजबूत होते. तुमच्याकडे उलटी गंगा वाहते आहे. असे स्पष्ट करत त्यांनी सरकारच्या चुकीच्या पद्धतीवर बोट ठेवले.
या सरकारचा एकच मंत्र आहे – ” काम कमी आणि जाहिरात जास्त.” अशी टिका करून पाटील म्हणाले की, भारतात पंतप्रधान आवास योजनेपैकी मंजूर केलेल्या घरापैकी १२.८ टक्के घरे पुर्ण झालीत. जलजीवन मिशनचा निधी २०२५-२६ वर्षात ६७ हजार कोटी होता त्यातील ५० हदार कोटी कमी केला. आदीवासी विभागाचा निधी ४७ टक्के कमी केला. ग्रामसडक योजनेच्या निधीत कपात केली. लाडकी बहीणची योजनेची एकूण तरतूद ३८,३०८ कोटी वरून आता २६ हजार ५०० कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजे ११,८०८ कोटी रुपयांची (जवळपास ३१ टक्के) कपात केली आहे. अशी आकडेवारी त्यांनी मांडली.
या सरकारला मागणी केली नसताना रस्ते पुल बांधायचे आहेत तिकडे जास्त लक्ष या सरकारचं आहे. यातून फक्त ठेकेदारांचे भले होणार पण ठेकेदारांचे बिलं द्यायला सरकारकडे पैसा नाही. ठेकेदार आत्महत्या करत आहेत ज्यांची बिलं थकीत आहेत त्यांना तरी वाचवा असे पाटील म्हणाले.
शिक्षण विभागाची अवस्था तर फार बिकट आहे. ७ वीच्या मुलांना २ रीचे पुस्तक वाचता येत नाही. शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. परदेशी शिष्यवृत्ती ४० टक्के वरून १५ टक्के केली. तांत्रिक शिक्षणावरचा १६०० कोटी होता त्यामध्ये ५० टक्के कपात केली. खेळातही देशाची पिछेहाट होताना दिसत आहेत. आलिम्पिकमध्ये ५८ गोल्ड मिळाले नंतर ११ झाले नंतर ११ वरून ४ मेडल कमी झाले. म्हणजे खेळातही आधोगती झाली मग निधी कुठे खर्च होतो असा सवाल पाटील यांनी केला.
