माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

मुकुंद रांजणे

माथेरान: माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासकीय राजवटीत अधिकारी, कर्मचारी वेळ मिळेल त्याप्रमाणे हजर राहून कार्यालयीन कामकाज कसेतरी पहात होते. चार ते पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने त्यावेळी या कार्यालयावर येथील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे होते परंतु केवळ सभागृहात सदस्य पद नसल्याने प्रत्येकाचा अहंभाव आड येत होता. त्यामुळे गावातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजच्या घडीला नगरपरिषदेत सत्ताधारी गट स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सुद्धा तीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दुपारी बारा वाजले तरी कुणी अधिकारी अथवा कार्यालयीन कामकाज पाहणारा द्वितीय श्रेणीतील अधिकारी वर्ग हजर नसतात. ज्या काही मुली मानधनावर कार्यरत आहेत त्याच काहिनाकाही कामे करत आहेत. नागरिकांना घरभाडे भरावयाचे असल्यास अथवा अन्य काही कामे करून घ्यावयाची झाल्यास अधिकारी नसल्याने नागरिकांना भर उन्हातान्हात  फेऱ्या माराव्या लागत आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निदान यापुढे तरी अधिकारी वर्गावर अंकुश ठेवतील की नाही अन्यथा निश्चितच माथेरानचे भवितव्य अंधकारमय आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेकदा अमुक अधिकारी अलिबागला मिटिंगला गेलेत तर कुणी मंत्रालयात गेलेत अशीही उत्तरे ऐकावयास मिळतात. या सर्व कामानिमित्त जाणाऱ्या अधिकारी वर्गाची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जात आहे की नाही, ही मंडळी खरोखरच मिटिंगच्या बहाण्याने कर्तव्य पार पाडतात की घरीच असतात असाही प्रश्न स्थानिकांमधुन विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *