मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…!
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…!
वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातील रहिवासी व स्वतःला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख करून देणारे समीर रुक्मांगद कुडाळकर यांनी प्रदेश भाजपा अध्यक्षांकडे निवेदन सादर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि राणे समर्थक भाजपा नेते मनीष दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. कट्टर राणे समर्थक असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे दळवी यांच्या विरोधात मुळच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुरुंग पेरायला सुरुवात केली असून यामागे ‘त्या ‘अदृश्य शक्तीचा हात असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांमागे रंगली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार पक्षाकडून मनीष दळवी यांना देण्यात आले होते. मात्र या अधिकारांचा वापर करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेल्याचा आरोप कुडाळकर यांनी या निवेदनात केला आहे. या निर्णयांमुळे तालुक्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार असतानाही मनीष दळवी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल केल्याचे कुडाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या आदेशानंतर आपण आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर मनीष दळवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आडेली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली याकडे कुडाळकर यांनी लक्ष वेधले असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यासोबतच वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारी वाटप, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवादाचा अभाव, तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना दिलेल्या छुप्या पाठिंब्याबाबतही कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. निवडणूक काळात काही निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुरेसे महत्व दिले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.
दरम्यान, कुडाळकर यांनी आपल्या निलंबनाबाबतही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष उमेदवाराविरुद्ध लढवली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षातून केलेले त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात मनीष दळवी किंवा भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर या निवेदनाची चर्चा रंगली असून प्रदेशाध्यक्ष याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर या अदृश्य शक्तीने राणे समर्थकांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपले लक्ष वळवले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
