युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात
गॅसची आणीबाणी
स्लग – केंद्र सरकारकडून गॅससाठी एस्मा कायदा लागू
गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर
आधी घरगुती गॅसला प्राधान्य मग औद्योगिक वापरासाठी होणार गॅसचा वापर
मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धामुळे देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी निर्माण झाली आहे. घरगुतीसह व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम आता उद्योगासह हॉटेल व्यवसायावर झाला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबल्याने त्यावर अवंलबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने देशभरात एस्मा कायदा लागू केला आहे.
या एस्मा कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. आखात देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळतनसल्याने मुंबईतील तब्बल २० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची नामुष्की हॉटेल व्यावसायिकांवर ओढावली आहे. अशीच परिस्थिती आणखी दोन-तीन दिवस राहिल्यास शहरातील ५० टक्के हॉटेल बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीवर निर्बंध आले आहेत. सरकारने गॅसपुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याचे हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांचे म्हणणे आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठा रोखण्याच्या ५ मार्चच्या सरकारी आदेशाचा हवाला देऊन वितरकांनी सिलिंडर पुरवठा रोखला आहे. सरकारने याबाबत हस्तक्षेप करून स्पष्ट आदेश जारी करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
जर गॅस पुरवठ्याची परिस्थिती सुधारली नाही तर येत्या दोन दिवसांत शहरातील ५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात अशी शंका हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) व्यक्त केली आहे.
गॅस उपलब्धतेवरील अनिश्चिततेमुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सने आधीच खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. तसेच काही हॉटेल्सच्या चालक-मालकांनी कामकाज मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे.
भारतात व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेकांनी गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र आहे.
