सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…!

सर्व निवडी बिनविरोध…!

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी )– जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेचे सभापती आणि उप -सभापती बिनविरोध निवडून आले असून सर्व ठिकाणी महायुतीचाच  झेंडा फडकला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेचे मिलिंद नाईक तर उप -सभापती पदी भाजपाचे सिताराम तेली बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे नाईक हे तुळसुली गावचे तर तेली हे हुमरस गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. या निवडीनंतर सभापती दालनामध्ये भाजपा खासदार नारायण राणे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश  राणे यांचे फोटो लावण्यात येऊन महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

मालवणमध्ये शिंदे सेनेच्या पोईप मतदारसंघातील सदस्या प्रज्ञा चव्हाण तर उप-सभापतीपदी भाजपाचे वायरी   – भूतनाथ मतदारसंघाचे सदस्य घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड झाली. देवगडमध्ये भाजपाचे गणेश राणे हे सभापती झाले तर शिंदे सेनेचे अमोल लोके हे उप- सभापती बिनविरोध विजयी झाले आहेत. याठिकाणी महायुतीची निर्विवाद सत्ता आहे.

कणकवली पंचायत समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे नांदगाव पं. स.मतदारसंघातून  बिनविरोध विजयी  झालेल्या हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे  तर उप-सभापतीपदी वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेले राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणकवलीत  भाजपाचे १४ तर शिंदे सेनेचे दोन अशा १६ ही जागांवर महायुतीचीच सत्ता आहे. महायुतीचेच सर्व  उमेदवार विजयी होऊन  एकहाती सत्ता मिळाली आहे.

वैभववाडीत सभापती आणि उप-सभापती हे दोन्ही भाजपाचेच असून दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे तर उप- सभापतीपदी सौ. साची सचिन  कोलते या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोडामार्ग  तालुक्यात महायुतीची एकहाती सत्ता आल्याने सभापतीपदासाठी भाजपच्या पार्वती गवस यांची तर उप-सभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे.

वेंगुर्ल्यात सभापतीपदी मातोंडचे भाजपा सदस्य शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उप-सभापतीपदी शिंदे सेनेचे परुळे प. स.सदस्य सचिन देसाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडीत शिंदे सेनेच्या सुस्मिता जाधव या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत  तर उप-सभापतीपदी भाजपाचे गौरव मुळीक हे बिनविरोध निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *