अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे

अनिल ठाणेकर

पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल. हे प्रकरण म्हणजे “सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी” या धोकादायक संगनमताचे स्पष्ट उदाहरण आहे. समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत, तथाकथित अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र आहे. या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की अशा प्रकारची बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे. यावेळी डॉ. ठकसेन गोराने, विनायक सावळे, विजय परब, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर काशीद, शहाजी भोसले, आरती नाईक, उत्तम जोगदंड, ॲड मनीषा महाजन, ॲड. परिक्रमा खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अशोक खरात प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) पूर्णपणे निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी. कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३ या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची नियमावली तयार करण्याची रखडलेली प्रक्रिया शासनाने त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके तयार करून अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर तात्काळ कारवाई केली जावी. अशोक खरातच्या या भयंकर शोषणाच्या प्रकरणात फलज्योतिष हे प्रमुख साधन म्हणून वापरले गेले. स्वतःला तो अंक आणि हस्तरेषाशास्त्राचा तज्ञ म्हणून मिरवत होता. प्रत्यक्षात फलज्योतिष ही मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करणारी बुवाबाजी आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण प्रस्थापित करावे. या प्रकरणातील सर्व पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी. त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि संरक्षण देण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी. साक्ष देणाऱ्या महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जावी.आरोपी व्यक्तीचे विविध राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबद्दल स्वतंत्र निवेदन करावे.सर्व राजकीय पक्षांनी तथाकथित बुवा-बाबा, मांत्रिक आणि ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तात्काळ तोडावेत. अशा व्यक्तींना सार्वजनिक पाठबळ देणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची आचारसंहिता सर्व पक्षांनी तयार करावे.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने व्यापक जनजागृती अभियान राबवावे. शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर विवेकवादी विचारांचा प्रसार करावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ३ एप्रिल, शुक्रवार रोजी नाशिक येथे “फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद” आयोजित करण्यात येणार आहे. तसेच फलज्योतिषविरोधी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रेचे आयोजनही करण्यात येणार आहे.हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचा मुद्दा नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि महिलांवरील अत्याचार यांचा संगम आहे. त्यामुळे यावर केवळ तात्पुरती कारवाई नव्हे, तर दीर्घकालीन धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे.महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही.समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हीच महा अंनिसची ठाम भूमिका आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *