१४ हॉस्पिटलमध्ये चुरस 
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर-उपनगर व ठाणे जिल्ह्यातील १४ नामवंत हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये २३ मार्चपासून चुरस होईल. लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई आणि बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द जे.जे. हॉस्पिटल यामधील उद्घाटनीय लढती क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे व क्रीडाप्रेमी संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्कमध्ये सोमवारी सकाळी ९.१५ वा. होणार आहेत. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटमधील संघटक हिंदुजा हॉस्पिटलचे अधिकारी जॉय चक्रबर्ती यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दिली.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी गतविजेता नानावटी हॉस्पिटल, उपविजेता ब्रीच कँडी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, के.आय.एम.एस. हॉस्पिटल-ठाणे आदी रुग्णालयीन क्रिकेट संघ दावेदारीच्या रुबाबात अटीतटीच्या लढती देतील. एलआयसी सहप्रायोजित टॉप-१२ संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक असून सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यामधील दोन्ही संघातील एका उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *