एकविरा देवी यात्रेसाठी टोलमाफी करण्याची मागणी
विजय देशेकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र
कल्याण : २५ व २६ मार्च रोजी लोणावळा येथील कार्लेगडावर एकविरा देवीची यात्रा पार पडणार असून या यात्रेसाठी लाखो भक्त येत असतात. यात्रेसाठी येणाऱ्या एकविरा भक्तांना टोलमाफी करण्याची मागणी टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एकविरा भक्त विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे.
लोणावळा परिसरातील एकविरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक २५ व २६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात जत्रा व धार्मिक उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी आगरी-कोळी समाजासह लाखो भाविक कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थित राहतात. अनेक भक्तांनी घेतलेले नवस फेडण्यासाठीही याच दिवशी विशेष गर्दी होत असते. एकविरा आई ही कोळी-आगरी समाजाची आराध्य देवता असून, हा उत्सव समाजासाठी अत्यंत भावनिक व श्रद्धेचा विषय आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भाविक स्वतःच्या वाहनांनी येत असतात. त्यामुळे संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर मोठा आर्थिक भार सामान्य भक्तांवर पडतो.
शासन विविध सण-उत्सवांच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी टोलमाफीसारखे सकारात्मक निर्णय घेत असते. त्याच धर्तीवर, दिनांक २५ व २६ मार्च २०२६ रोजी एकविरा आईच्या जत्रेनिमित्त संबंधित मार्गांवरील टोलमाफी जाहीर करण्यात यावी. या निर्णयामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळेल आणि शासनाविषयी अधिक आत्मीयता निर्माण होईल. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
