मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत अनुभवांचे स्मॅश
मुंबई : मुंबईच्या टेबल टेनिसच्या टेबलवर अनुभवी खेळाडूंनी अक्षरशः धमाका केला. विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात नुकत्याच रंगलेल्या मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरचे डॉ. नितीन तोष्णीवाल आणि मुंबईचे सरोष श्रॉफ यांनी आपल्या खेळाचा झंझावात उडवत दुहेरी सुवर्णपदकांवर शिक्कामोर्तब केले.
५० वर्षावरील गटात डॉ. तोष्णीवाल यांनी आपल्या अचूक फटक्यांनी आणि धारदार रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गुडघ्यावर आणले. अंतिम फेरीत कपिल कुमारला ११-९, ११-८, १२-१० अशा सरळ गेममध्ये हरवत त्यांनी एकेरी किताब पटकावला. इतक्यावरच न थांबता तेजस नाईकच्या साथीने दुहेरीतही त्यांनी दबदबा कायम ठेवत सरोष श्रॉफ-जोगेश मोटानी जोडीचा ११-९, १२-१०, १३-११ असा पराभव करत दुहेरी सुवर्णाचा झेंडा रोवला.
दुसरीकडे, ६० वर्षावरील गटात सरोष श्रॉफ यांनी अनुभव आणि अचूकतेचा परिपूर्ण मिलाफ सादर करत एल. व्ही. ठाकरे यांना ११-५, ११-५, ११-८ ने धूळ चारली. त्यानंतर दुहेरीत जोगेश मोटानीच्या जोडीने त्यांनी एल. व्ही. ठाकरे-शैलेश गोसाईन यांच्यावर ११-८, १४-१२, १४-१२ अशी मात करत आणखी एक सुवर्ण पटकावले.
या स्पर्धेत गुजरातचे एल. व्ही. ठाकरे, हैदराबादचे निजामुद्दीन ताहेर आणि आर. जे. हरी कृष्ण यांनीही आपल्या खेळातून चुरस निर्माण केली. महिला गटात शिवप्रिया हिने दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले, तर सुकन्या उपविजेती ठरली. ज्येष्ठ आणि अनुभवी टेबल टेनिसपटूंच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू आणि व्यायाममहर्षी मधुकर तळवळकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
00000000
