बेतवडे ग्रामस्थांचा बिल्डरविरोधात संताप

करारातील त्रुटी, RERA नोंदणीचा अभाव; २८ मार्चला मोर्चा

कल्याण: दिवा-बेतवडे परिसरात एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला असून, करारातील त्रुटी, विकास कामांबाबतची अनिश्चितता आणि जबरदस्तीने जमीन हस्तगत केल्याचे आरोप समोर आले आहेत. गाव समितीला डावलून व्यवहार केल्याचा आरोप करत स्थानिकांनी “ही सरळ फसवणूक” असल्याचे म्हटले आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत अनेक गंभीर मुद्दे पुढे आले. करारामध्ये विकास कामांची सुरुवात कधी होणार, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे वकील तृप्ती पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित प्रकल्पाची RERA नोंदणी नसल्याचा आरोपही करण्यात आला. “करार व्यवस्थित नसल्याने पुढे मोठे नुकसान होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी उपस्थितांनी सांगितले की, न्यायालयीन स्थगिती (स्टे) असतानाही बांधकाम सुरू असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे तातडीने न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळवण्याची आणि कायदेशीर लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाकडे निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, “खोटे गुन्हे दाखल करू नका, कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा द्या,” असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.

लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात भूमिका मांडली. आमदार राजेश मोरे यांनी फोनद्वारे “ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. नगरसेवक दिपक जाधव यांनीही “ठरलेल्या कालावधीत मोबदला मिळालेला नाही,” असे सांगत ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला. ब्रह्म पाटील यांनी “या प्रश्नात राजकारण आणू नये,” असे मत व्यक्त केले.

ग्रामस्थ नेते संतोष केणे यांनी “वाद घालण्यात अर्थ नाही, एकजूट ठेवून कायदेशीर मार्गाने लढा देणे गरजेचे आहे,” असे सांगितले. रमाकांत मढवी आणि काळू कोमासकर यांनीही बिल्डरकडून विश्वासघात व फसवणुकीचे आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी मुंब्रा येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आंदोलन योग्य ठिकाणी आणि कायदेशीर चौकटीतच होईल, मात्र गरज पडल्यास आक्रमक भूमिकाही घ्यावी लागेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बिल्डरविरोधात “फसवणूक” दर्शवणारे फलक लावण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, विविध गावांमधील ग्रामस्थ आणि संघटनांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला असून, आगरी सेनेनेही समर्थन जाहीर केले आहे. “गावपण टिकवण्यासाठी आणि हक्कांसाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई एकत्रितपणे लढू,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *