मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील खेळाडूंसाठी खास गणवेश म्हणून रंगीत टी शर्ट तयार केला असून त्याचे अनावरण आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सुप्रसिद्ध विकासक विजय पाटील यांच्या हस्ते तर विश्व् विजेते कॅरमपटू प्रशांत मोरे व संदीप दिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, दत्तप्रसाद शेंबेकर, संतोष चव्हाण व सिस्का कॅरम कंपनीचे प्रमुख अतुल मेहरा उपस्थित होते. सन २०२६-२०२७ सालाकरिता साहित्य पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीचे बुलेट शॉट कॅरम व बुलेट शॉट सोंगट्या वापरण्यात येणार असल्याचे या प्रसांगी जाहीर करण्यात आले. कॅरमच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने जवळपास २०० पेक्षा जास्त खेळाडू, पंच व कॅरमप्रेमी या कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने खेळाच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयाची माहिती दिली. नवीन वर्षात संघटनेने महिलांच्या बक्षिसात व पंचांच्या मानधनात वाढ केली असून विश्व् अजिंक्यपद व विश्वकप जिंकणाऱ्या राज्यातील खेळाडूस यापुढे रोख पारितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ यापुढे वातानुकूलित रेल्वेने प्रवास करेल अशी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय खेळाडूंना यापुढे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. याबाबत सविस्तर एकंदर ७७ कलमांची स्पर्धा व सर्वसाधारण मार्गदर्शिका असोसिएशनने तयार केली असून त्याचे पालन खेळाडू, पंच व पदाधिकाऱ्यांना यापुढे करावे लागणार आहे असे अरुण केदार यांनी सांगितले. तर जितेंद्र शाह यांनी असोसिएशनच्या कामकाजाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे विजय पाटील असोसिएशनच्या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करून असोसिएशनच्या पाठीशी असल्याचे सांगितले. केतन चिखले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.
०००००००००
