कल्याण : कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात एका धाडसी व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात संत रोहिदास वाडा येथे राहणारे शैलेंद्र भोईर यांनी पाण्यात बुडणाऱ्या महिलेला आपला जीव धोक्यात घालून वाचवले होते. त्यांच्या या शौर्यपूर्ण कृत्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला खोल पाण्यात बुडू लागली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शैलेंद्र भोईर या धाडसी व्यक्तीने कोणतीही भीती न बाळगता तत्काळ पाण्यात उडी घेतली आणि महिलेपर्यंत पोहोचून तिला सुरक्षित बाहेर काढले. या प्रसंगामुळे महिलेचा जीव वाचला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.
या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल प्रभाग क्र. ८ चे भाजपा नगरसेवक अमित धाक्रस, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर, उपशहर प्रमुख विलास भोईर, भाजपा सरचिटणीस प्रशांत माळी, ऍड.समृद्ध ताडमारे, दिनेश ठक्कर, विकास रोकडे, सचिन सोष्टे, गणेश वाळंज, भावेश ढोलकीया, नितीन भोईर, जितेंद्र भोईर, योगेश साळवे, महेंद्र बोंबे, प्रशांत जाधव आदींसह स्थानिक सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करताना सांगितले की, अशा प्रकारचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटाच्या वेळी धैर्य दाखवणे हीच खरी मानवतेची ओळख आहे. सत्काराला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण कृतज्ञता व अभिमानाने भारलेले होते.
