मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार
‘सुरक्षेची खात्री, मगच प्रवासाची सुसाट भरारी’ – प्रताप सरनाईक
मीरा-भाईंदर: गेल्या दीड दशकापासून मीरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नाही,’ असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाची सविस्तर पाहणी केली. सुरक्षिततेची सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून, आगामी एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
एप्रिलमध्ये घुमणार मेट्रोची शिट्टी
२००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले ‘मेट्रोचे वचन’ आज पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या संघर्षाचे फळ मिळत असल्याची भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. तसेच मेट्रोची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा विषयक (Security Certificates) प्रमाणपत्रे मिळण्यास काही काळ लागल्याने उद्घाटनाला विलंब झाला, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची बारकाईने पडताळणी केली. कोणत्याही संकटाच्या वेळी ही यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, याची त्यांनी खात्री केली. एका तासाला ४,५०० म्हणजे दिवसाला जवळ जवळ ५० हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण पूर्तता आणि पडताळणी आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते या मेट्रोचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री प्रतात्प सरनाईक म्हणतात कि, “मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सुविधा देण्याला महत्त्व देत नाही, तर त्या सुविधेमध्ये माझ्या नागरिकांचा जीव सुरक्षित असण्याला माझे प्रथम प्राधान्य आहे. आज सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून मीरा-भाईंदरकर मेट्रोचा सुखद प्रवास अनुभवू शकतील. वाचन दिले आणि ते पूर्ण हि केले. आता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास फक्त वेगवानच नाही, तर सुरक्षित आणि सुखकरही असेल”
