अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी

मुंबई : चंदीगड येथील पंजाब यूनिवर्सिटीमध्ये १३ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल मधील जिम्नॅस्ट इशिता रेवाले हिने उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकली. तसेच अखिल भारतीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवत तिने संकुलाचे नाव उज्ज्वल केले.

या स्पर्धेत इशिताने संघ स्पर्धा तसेच भूमीवरील व्यायाम प्रकारात दोन रौप्य पदके पटकावली, तर असमतोल दांड्यांच्या प्रकारात सुवर्ण पदक जिंकत आपले कौशल्य सिद्ध केले. सातत्यपूर्ण सराव, तांत्रिक प्रावीण्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.

आपल्या यशाबद्दल बोलताना इशिताने सांगितले की, “माझ्या क्रीडा प्रवासात कठोर परिश्रम, शिस्त तसेच प्रशिक्षक, सहकारी आणि कुटुंबीयांचा न संपणारा पाठिंबा यांचा मोठा वाटा आहे. व्यायाम चटईवर घालवलेला प्रत्येक क्षण मला अधिक सक्षम बनवत गेला आणि त्याचा मला अभिमान वाटतो. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे,” असा निर्धारही तिने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *