छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाव्यात स्नेहसंमेलन

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अभिनव संकल्पना

मुंबई, (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील सेवानिवृत्तांच्या तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच लखमशी नप्पू हॉल, माटुंगा येथे संपन्न झाला. विश्वनाथ बंगेरा यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या दमदार प्रवेशाने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला अत्यंत मराठमोळ्या आणि अत्युच्च वातावरणात पोहोचविले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच महापालिका कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन साजरे होत आहे, असा आभास निर्माण झाला होता.

यावेळी प्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलांची पेशकश उपस्थितांची वाहव्वा मिळवून गेली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सुषमा भागवत यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहसनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. तद्नंतर सादर झालेल्या मराठी गाण्यांवर उपस्थित सेवानिवृत्तांची पावले याही वयात थिरकली. यावेळी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र गीताच्या वेळी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या प्रवेशाने कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक संजय मोरे, विजय पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा रवींद्र मोरे व प्रकाश मोरये यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शेट्ये, वंदना शिर्के व ज्योत्स्ना मुळावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *