मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करा – वर्षा गायकवाड

नवी दिल्ली : मुंबईतील कुर्ला ते ट्रॉम्बे रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामामुळे हजारो कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्या घरांवर तोडफोडीचे संकट निर्माण झाले आहे.  स्थानिकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. ही फक्त झोपडपट्टी नाही, तर हजारो कुटुंबांचे संसार आणि त्यांच्या मुलांचे भविष्य आहे. या लोकांनी कष्टाने उभारलेल्या घरांचे संरक्षण व्हावे व  त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत शून्य प्रहरात कुर्ला ट्रॉम्बे झोपडपट्टीवासियांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कुर्ला–ट्रॉम्बे मार्गालगत असलेल्या ३,१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासन नोटीसा पाठवत आहे. ही झोपडपट्टी दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात असून हजारो गरीब व कष्टकरी कुटुंबांचे ते घर आहे. ३,००० हून अधिक झोपड्या पाडणे हे अमानवी व अव्यवहार्य असून हजारो कुटुंबे रातोरात बेघर होतील. हे पाडकाम करण्याआधी बाधित कुटुंबांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करावे. मुंबईत लाखो नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, केंद्र सरकारच्या जागेवरील या लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे ठोस धोरणाच नाही. राज्य आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी धोरण तयार करावे. या विषयावर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे, सरकारने या लोकांना बेघर करू नये असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *