मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप
दिवा: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजवंत नागरिकांसह शासकीय कामात सहकार्य करणाऱ्या पोलीस मित्रांना सुमारे २०० ते २५० जणांना राशन किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. त्यांनी स्वतः पुढाकार घेत लाभार्थ्यांना मदतीचा हात दिला. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, रमजानच्या पवित्र महिन्यात समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
