सुपर कॉर्पोरेट फुटबॉल लीग

रुबेनच्या दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखान्याचा सहज विजय

मुंबई, २३ मार्च: आक्रमक स्ट्रायकर रुबेन फर्नांडिसच्या अप्रतिम दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखाना लिमिटेडने मुंबई फुटबॉल असोसिएशन (एमएफए) सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये नेव्हल डॉकयार्डविरुद्ध ४-१ असा एकतर्फी विजय मिळवला.

चर्चगेट येथील कर्नाटक एसए मैदानावर झालेल्या सामन्यात सोमवारी मध्यंतरापर्यंत कॅथलिक जिमखान्याकडे २-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धात त्यात आणखी दोन गोलची भर घातली. रुबेनचे सहकारी कस्तुभ मेहेर आणि करण कपूरने प्रत्येकी एक गोल करून विजयात खारीचा वाटा उचलला. नेव्हल डॉकयार्डकडून एकमेव गोल मिलिंद मेहेरने पेनल्टीवर पहिल्या सत्रात केला.

११ व्या मिनिटाला करणने फॉरवर्ड पास देऊन रुबेनला गोल करण्याची संधी दिली. रुबेनने चेंडूवर नियंत्रण ठेवत प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने धाव घेतली आणि अचूक प्लेसमेंटने डॉकयार्डचा गोलकीपर कुंदन धनूला सहज चकवले. त्यानंतर, २८ व्या मिनिटाला कस्तुभने चेंडू गोल जाळ्यात ढकलून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (२-०) दुप्पट केली. मध्यंतरापूर्वी काही मिनिटांपूर्वी, किंग्स्टन परेराने पेनल्टी एरिया क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळल्यामुळे डॉकयार्डला पेनल्टी मिळाली. त्यावर मिलिंद मेहेरने पेनल्टी स्पॉटवरून गोल केला.

उत्तरार्धात, रुबेनने गोलपोस्टच्या डाव्या बाजूने डाव्या पायाने मारलेल्या जोरदार लो-शॉटने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (३-१) वाढवली. त्यानंतर, रुबेनच्या थ्रू पासवर करणने पुढे आलेल्या गोलकीपरला चकवून सर्वोत्तम गोल केला. कॅथलिक जिमखान्याचा हा सलग तिसरा विजय आहे.

निकाल: कॅथलिक जिमखाना लिमिटेड ४(रुबेन फर्नांडिस २, कस्तुभ मेहेर, करण कपूर प्रत्येकी १) विजयी वि. नेव्हल डॉकयार्ड १ (मिलिंद मेहेर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *