लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा
रमेश औताडे
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि महाक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई उपविभाग प्रमुख नरसिंग सोपानराव सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन टपालाने पाठवले आहे.
भारतीय लहुजी सेनेने आपल्या निवेदनात मांग समाजातील तरुणांच्या रोजगाराचा आणि लष्करी प्रशिक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः स्वतंत्र मांग बटालियनची निर्मितीः समाजाच्या शौर्याचा वारसा जपत ‘मांग बटालियन’ची स्थापना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या बटालियनमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना तातडीने सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. सर्व पोटजातींचा समावेशः मांग समाजातील एकूण १२ पोटजातींमधील तरुणांना याचा लाभ मिळावा. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिक, मादिक, दानखणी मांग, मांग मटाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, तसेच २२ मे २०१२ च्या निर्णयानुसार समाविष्ट मादगी आणि मादिगा या जातींचा उल्लेख पत्रात केला आहे. मंत्रालयाने १७ मार्च २०२६ रोजी त्याची दखल घेत त्यावर स्वाक्षरी केली आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
