वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण
शहापूरात वन्यप्राण्यांसाठी आणलेले कृत्रिम पाणवठे काष्ट विक्री आगारात पडून
अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर तालुक्यातील प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी कृत्रिम पाणवठ्यांचा पुरवठा करण्यात आला होता.परंतु धक्कादायक वास्तव म्हणजे हे बशीच्या आकाराचे सरकारी पाणवठे मार्च महिना संपत आला तरीही वनविभागाकडून जंगलात अद्यापही बसविण्यात आले नाहीत हे पाणवठे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र येथे दिसत आहे.जंगलात पाणवठे न ठेवता अगदी निष्काळजीपणे हे कृत्रिम पानवठे येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.
उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या प्रादेशिक वनविभागाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात हे कृत्रिम बशीच्या आकाराचे पाणवठे दाट जंगलात बसविण्यात येणार होते.येथील विस्तीर्ण व घनदाट अशा जंगलात बिबटे,तरस,कोल्हे,भेकर,नीलगाय चौशिंग,ससे,रानडुक्कर,वानर,रानमांजर यांसह अन्य लहान वन्यप्राणी व दुर्मिळ अशा पक्ष्यांचा अधिवास आढळतो.या प्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच त्यांच्या अधिवासात पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी जंगल सोडून गाव वस्त्यांवर व इतरत्र स्थलांतर करू नयेत यासाठी सरकारने बशीच्या आकाराचे कृत्रिम असे पाणवठे म्हणजेच वॉटर होल जंगलात ठेवण्यासाठी वनविभागाला पुरवठा केले होते या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाकडून टँकर अथवा बैलगाडीने पाणी आणून ओतले जाणार असे प्रयोजन होते हे पाणवठे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. परंतु हे कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यातील मार्च महिना संपत आला तरीही जंगलात अद्यापही बसविण्यात आलेच नाहीत हे पाणवठे येथील काष्ट विक्री आगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र पाहावयास मिळत आहे.जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली दिसत नाही.परिणामी पाण्याच्या शोधात पाणवठ्याकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याअभावी येथून माघारी फिरावे लागते आहे.उन्हाच्या काहीलीनं पाण्यसाठी तहानेने व्याकूळ झालेल्या असंख्य वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची पाण्याअभावी जंगलात घुसमट होत आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशः बेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे पाणवठे जंगलात उन्हाळ्यात वेळेवर बसविण्यात आले नसल्याने परिणामी वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
