सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !
आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानातून सवाल
रमेश औताडे
मुंबई : आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, “ सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे “ असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक ‘चौथी मुंबई’ योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा.
ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी.
कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजारांचा विकास करताना मच्छीमार महिलांना विश्वासात घ्यावे. मच्छिमारांची सर्व प्रकारची थकीत कर्जे शेतकऱ्याप्रमाणे माफ करावी. गोराई येथील प्रस्तावित निक्षारीकरण प्रकल्प रद्द करावा. घराच्या व मासळी सुकविण्याच्या, बोटी शाकारणीच्या वहिवाटी खालच्या जागा नावे करा. या मागण्या करण्यात आल्या.
मोठ्या भांडवलदारांसाठी आदिवासी, भूमिहीन, मच्छीमार अशा घटकावर अन्याय तर होत आहेच, मात्र जे या प्रकल्पात सहभागी नाहीत त्यांना प्रदूषित हवेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा फटका बसणार आहे, असे किरण कोळी यांनी सांगितले. सरकारने आता अधिवेशनातील उरलेल्या दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा लढा अजून तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
