सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा

‘लामितिये 2026’ सरावात भारतीय नौदलाचा पहिलाच सहभाग

मुंबई : भारतीय नौदलाचे अदृष्यता-क्षम युद्धनौका आयएनएस त्रिकंदने २० मार्चला पोर्ट विक्टोरिया येथील यशस्वी बंदर भेट पूर्ण करून तेथून प्रस्थान केले. या भेटीदरम्यान जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन कुलकर्णी यांनी सेशेल्समधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह भारताचे उच्चायुक्त यांची सदिच्छा भेट घेतली.

या दौऱ्यात जहाजाने सेशेल्स सरकारला अत्यावश्यक सुटे भाग व आवश्यक साहित्य सुपूर्द करून द्विपक्षीय सहकार्याचा संदेश दिला. तसेच Exercise Lamitie २०२६ या त्रिसेवा संयुक्त सरावाच्या पहिल्या आवृत्तीत सहभाग नोंदवत भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सरावात भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि सेशेल्स संरक्षण दल (एसडीएफ) यांचे सदस्य सहभागी झाले होते.

बंदर टप्प्यात जहाजावर ‘व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीझर’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये संयुक्त चढाई सरावाचाही समावेश होता. सागरी टप्प्यात आयएनएस ‘त्रिकंद’ने एससीजीएस ले व्हिजिलंट सोबत संयुक्त सागरी सराव केला. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडो आणि एसडीएफच्या विशेष दलाच्या संयुक्त पथकाने समुद्रात चढाई कारवाईचे प्रात्यक्षिक सादर केले.

त्यानंतर भारतीय सेना व सेशेल्स संरक्षण दलाच्या जवानांनी प्रास्लिन बेटावर उतरणीची संयुक्त कारवाई केली. या सागरी टप्प्याचा आढावा घेण्यासाठी एसडीएफचे संरक्षण दल प्रमुख मेजर जनरल मायकेल रोसेट, उपप्रमुख ब्रिगेडियर जीन अटाला यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी आयएनएस ‘त्रिकंद’वर उपस्थित होते.

या सरावामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातील परस्पर कार्यक्षमता वाढविणे तसेच सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली. हिंद महासागर क्षेत्रात प्राधान्य सुरक्षा भागीदार आणि प्रथम प्रतिसाद देणारा म्हणून भारतीय नौदलाची बांधिलकी या भेटीतून अधोरेखित झाली.

 ‘लामितिये’ म्हणजे मैत्री
‘लामितिये’ हा क्रेओल भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ “मैत्री” असा होतो. भारत-सेशेल्स यांच्यातील ऐतिहासिक संबंध, विश्वास आणि संरक्षण सहकार्याचे प्रतीक म्हणून या संयुक्त सरावाला हे नाव देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *