‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले

स्वतः डॉ. हेमराज शाह यांच्या अश्रूंचा फुटला बांध

मुंबई, दि. (प्रतिनिधी): आई वडील यांचे छत्र गमावलेला तरुण सामखियाली, भचाऊ या कच्छच्या रणातून मुंबईत येतो काय, पदपथावर झोपून रात्री काढतो काय आणि मग संघर्षमय जीवन जगता जगता समस्त कच्छी, गुजराती बांधवांसाठी झटता झटता तब्बल सात मजली गुजराती भवन उभारुन समाज बांधवांना एका रेशमी धाग्यात गुंफून भली मोठी समाज बांधवांची माला तयार करतो काय. सारेच विलक्षण, सारेच अनाकलनीय, अकल्पनीय आणि त्यात पत्नी सौ. केसर यांचा ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू होतो तसेच एकुलती एक कन्या रेखा हिचा कर्करोगाने मृत्यू होतो. सुपुत्र उदय आणि अरविंद यांनी हेमराज शाह यांना पावलोपावली दिलेला आधार तसेच कोणतेही संवैधानिक पद नसतांना एक कादंबरी, एक डॉक्युमेंटरी आणि हेमूदादा ही दीर्घांकिका रंगमंचावर येते. अनेक देश विदेशातील संस्था डॉक्टरेट देऊन गौरव करतात. अशा या तरुणांनाही लाजवील अशा ८६ वर्षीय डॉक्टर हेमराज विरम शाह या अफलातून व्यक्तिमत्त्वाचे संघर्षमय जीवन उलगडताना चर्चगेट जवळील बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले आणि स्वतः डॉ हेमराजभाईंच्या ‘नयनां’तून अश्रूंचा बांध फुटला. बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कच्छ शक्ती वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह, चर्चगेट येथे त्यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ या वसंत मारु लिखित आणि वसंत मारु, कवन सांवला दिग्दर्शित दीर्घांकिका सादर करण्यात आली. लहान मोठ्या १६ कलाकारांनी या नाट्यप्रयोगात काम करतांना डॉ हेमराज शाह यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. जन्मभूमी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य संपादक पद्मभूषण कुंदनभाई व्यास समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गुजरातचे माजी अर्थमंत्री बाबुभाई मेघजी शाह, महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी बिपीन श्रीमाळी तसेच नवनीत प्रकाशनचे अनिल गाला आणि बिपिन गाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींनी डॉ. हेमराजभाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. नागजी रीठा यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *