अलिकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध संतांवर झालेले गंभीर आरोप ही चिंतेची बाब आहे. हे प्रकार केवळ व्यक्तींच्या पतनाचे निदर्शक नसून समाजातील अंधश्रद्धा आणि विवेकहानीचे द्योतक आहेत. संत तुकारामांनी आपल्या अभंगांमध्ये संताचे वर्णन केले आहे. त्यात न बसणाऱ्या आणि संतांचा मुखवटा घालून समाजाला फसवणाऱ्यांचे काय केले पाहिजे, हे ही सांगितले आहे.

अध्यात्म म्हणजे दिखावा, संपत्ती, प्रसिद्धी नव्हे; तर आत्मशुद्धी, नैतिकता आणि इतरांप्रती करुणा. या मूल्यांपासून दूर जाणारा ‌‘संत‌’ असूच शकत नाही. आजची वेळ ही केवळ निषेधाची नाही, तर परिवर्तनाची आहे. समाजाने ठामपणे ठरवले पाहिजे, की अशा प्रवृत्तीला स्थान नाही. कायदा, प्रशासन, माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिक हे सर्व मिळून या समस्येला सामोरे गेले, तरच खऱ्या अर्थाने न्याय आणि नैतिकता प्रस्थापित होईल. अन्यथा, ‌‘संत‌’ या पवित्र शब्दाची किंमत उरणार नाही आणि समाजाचा विश्वास कायमचा ढासळेल. आधुनिक माध्यमांच्या प्रसारामुळे ‌‘महाराज‌’ किंवा ‌‘बाबा‌’ यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर उभी केली जाते. सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल्स आणि मोठ्या प्रमाणावर होणारे धार्मिक कार्यक्रम यामुळे या व्यक्तींना प्रचंड लोकप्रियता मिळते; पण या लोकप्रियतेच्या आड अनेकदा अनैतिक कृत्ये लपलेली असतात. महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक, मानसिक शोषण यासारखे गंभीर आरोप समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयांनी दोष सिद्धही केले आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहे. महिलांच्या संदर्भात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. मनःशांती, समाधान, आध्यात्मिक आधार शोधण्याच्या प्रयत्नात अनेक महिला अशा कथित गुरूंच्या संपर्कात येतात. भावनिक, मानसिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे त्या अशा गुरुंवर सहज विश्वास ठेवतात; पण या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. ‌‘आशीर्वाद‌’, ‌‘उपचार‌’, ‌‘साधना‌’ अशा नावाखाली त्यांचे शोषण केले जाते. ही बाब केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाची लक्षणे आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये दिसणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय आश्रय. अनेक कथित महाराजांना स्थानिक तसेच राज्यस्तरीय नेत्यांचा पाठिंबा मिळतो. त्यांच्या कार्यक्रमांना राजकीय उपस्थिती असते, निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्यांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अशा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे गैरप्रकार अधिक बिनधोक सुरू राहतात. धर्म आणि राजकारण यांचे हे अयोग्य मिश्रण समाजासाठी घातक ठरते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याचेही दिसून येते. यामागे अनेक कारणे आहेत. पीडितेवर येणारा सामाजिक दबाव, पुराव्यांचा अभाव, दीर्घकालीन न्यायप्रक्रिया आणि प्रभावशाली आरोपींचा दबाव यामुळे अनेक महिला तक्रार दाखल करण्यासही घाबरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाचा खरा वारसा म्हणजे विवेक, समता आणि नैतिकता. कीर्तन ही परंपरेने प्रबोधनाची साधना होती. कीर्तनकार हा केवळ धार्मिक कथाकार नसून समाजाचा मार्गदर्शक मानला जात असे; परंतु आज काही ठिकाणी कीर्तन ही साधना न राहता एक ‌‘व्यवसाय‌’ बनली आहे. प्रसिद्धी, पैसा आणि राजकीय आश्रय यासाठी काहीजण या माध्यमाचा गैरवापर करताना दिसतात. अशा परिस्थितीत कीर्तनाचा मूळ उद्देश हरवून बसतो आणि श्रोत्यांची दिशाभूल होते.
संतांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले नाही; उलट त्यांनी प्रश्न विचारण्याची, सत्य शोधण्याची शिकवण दिली. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ‌‘देव‌’ मानणे, त्याच्यावर अंधविश्वास ठेवणे हे वारकरी परंपरेच्या विरोधात आहे. शिक्षण आणि जागृती हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः महिलांनी, स्वतःच्या अधिकारांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी जाताना विवेकबुद्धी वापरणे, प्रश्न विचारणे आणि शंका उपस्थित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच माध्यमांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. केवळ प्रसिद्धीच्या मोहापायी अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे. सरकार आणि प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. अशा प्रकरणांमध्ये तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी होणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि पीडितांना संरक्षण आणि न्याय मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच धार्मिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे, पारदर्शकता वाढवणे आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाची खरी ओळख पुन्हा प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. संतांच्या शिकवणीचा अर्थ केवळ भजन-कीर्तनात नाही, तर दैनंदिन जीवनात नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सहिष्णुता यांचा अवलंब करण्यात आहे. समाजाने या मूळ मूल्यांकडे परत जाणे आवश्यक आहे. अन्यथा, आध्यात्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेली ही अधोगती पुढील पिढ्यांसाठी घातक ठरेल.
आजची वेळ ही जागृतीची आहे. अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेपासून दूर राहून विवेक आणि सत्याचा मार्ग स्वीकारण्याची. वारकरी परंपरेचा खरा वारसा जपायचा असेल, तर ‌‘मद, मोह, मत्सर‌’ यांच्यापासून दूर राहण्याबरोबरच ‌‘अज्ञान, भीती आणि अंधविश्वास‌’ यांच्याशीही लढा देणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा कणा मानली जाते. ‌‘मद, मोह, मत्सर यांपासून दूर राहणे‌’ हा वारकरी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. साधेपणा, समता, नामस्मरण आणि सामूहिकतेतून व्यक्त होणारे अध्यात्म हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारख्या संतांनी या परंपरेला प्रबोधनाची धार दिली. त्यांच्या अभंगांमधून आणि कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय यावर प्रखर प्रहार झाला. म्हणूनच वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची एक मोठी लाट होती; परंतु आजच्या काळात या परंपरेच्या नावाखाली काही विकृत प्रवृत्ती डोके वर काढताना दिसतात. वारकरी संप्रदायाचा मूळ संदेश जिथे आत्मसंयम, विवेक आणि नैतिकता यांवर आधारलेला आहे, तिथे काही कथित कीर्तनकार आणि तथाकथित ‌‘महाराज‌’ भोगवृत्ती, सत्तेची लालसा आणि व्यक्तिपूजेला खतपाणी घालताना दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात घडलेली प्रकरणे पाहिली, की स्वतःला संत, महंत म्हणाऱ्यांचे पाय मातीचे असल्याचे दिसते. आसाराम बापूसह अनेकांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. कुंटणखाने चालवल्याच्या थाटात आश्रम चालवण्याचे प्रकार दिसले. त्याग वृत्तीऐवजी भोगवृत्ती आणि विलासी वृत्ती फोफावली.
अनेकदा मधुर वाणीखाली काय दडलेले असते, हे लवकर कळत नाही. त्यातही भक्त परिवार धूर्त बाबांच्या प्रेमात इतका आंधळा झालेला असतो, की बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही भक्त आरत्या ओवाळण्याचे कमी करत नव्हते. आसाराबापूला शिक्षा सुनावल्यानंतरही त्याचे समर्थक शाळांमधून त्यांच्या छायाचित्राच्या आणि काही कथित शिकवणुकीच्या वह्या वाटत होते. अलिकडच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात उघडकीस येणाऱ्या काही घटनांनी समाजमन हादरवून सोडले आहे. अध्यात्म, साधना, कीर्तन, प्रवचन या पवित्र संकल्पनांच्या आड लपून काही कथित ‌‘महाराज‌’ आणि ‌‘बाबा‌’ यांनी उभारलेले साम्राज्य आर्थिकच नाही, तर नैतिक अधःपतनाचेही प्रतीक बनले आहे. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याच्याविरोधात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप, नगर जिल्ह्यातील यशवंत एकनाथ थोरात उर्फ गुंजाळ महाराजावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे दाखल झालेला गुन्हा आणि या सर्वांमध्ये कथित राजकीय-सामाजिक आश्रयाची चर्चा या सगळ्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे आपण नेमके कुठे चाललो आहोत? खरात याने आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या ट्रस्टमधील काही विश्वस्त आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या त्याच्या कथित संबंधांमुळे या प्रकरणाने अधिकच वादळी स्वरूप धारण केले. या संदर्भात काही राजकीय नावेही समोर आली. खरातचे सर्वपक्षीय राजकारण्यांशी संबंध होते. त्याच्याकडे सापडलेल्या 58 व्हिडीओंमधून आता कोणत्या आणि किती महिलांवर अत्याचार झाले, यावर आता प्रकाश पडेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक आता त्याचा तपास करणार आहे, मात्र एकूणच अशा प्रकरणांमागे दडलेल्या वृत्तींचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे.

पैलू

भागा वरखडे

(अद्वैत फीचर्स)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *