ठाणे : श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथील भोळे सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, हळदी-कुंकू समारंभ तसेच मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनील चौधरी व ज्येष्ठ साहित्यिक बाळ कांदळकर यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थान गणेश राऊत यांनी भूषविले, तर मानसी उमेश महाडिक हळदी-कुंकू समारंभाच्या अध्यक्षा होत्या. संस्थेचे अध्यक्ष जयवंत रसाळ यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मालतीताई रमाकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत समाजप्रबोधनपर विचार मांडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या डॉ. मंजिरी प्रभाकर राऊत यांचा गौरव करण्यात आला. संतोष सागवेकर, संकेत चौधरी व उमेश महाडिक यांनी सूत्रसंचालन केले, तर सुनील झगडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
